यशोमुद्रा हा टंक बोरूने काढल्याप्रमाणे रेघेची जाडी कमीअधिक होणारा, पारंपरिक वळणाचा टंक आहे.
ह्या टंकात हलका (लाइट), साधा (नॉर्मल), मध्यम (मिडियम), निमठळक (सेमीबोल्ड) आणि ठळक (बोल्ड) अशी ५ वजने आहेत. प्रत्येक वजनाच्या सरळ आणि तिरपा (इटॅलिक) अशा २ शैली आहेत.
शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर आवश्यक ठरणारी चिन्हे आणि देवनागरी टंकांशी जुळणारे इंग्लिश टंकही ह्या टंकात समाविष्ट आहेत.
सदर टंक मुक्त (फ्री अॅण्ड ओपन सोर्स) परवान्यांतर्गत देण्यात आले असून त्यासोबत टंकांची सर्व तांत्रिक सामग्री उपलब्ध करून देण्यात येत आहे.
यशोमुद्रा आणि यशोवेणू ह्या दोन्ही टंकांतील अक्षराकारांची रुंदी जवळपास समान असल्याने मांडणीत फारसा बदल न करता हे टंक एकमेकांऐवजी वापरता येतात.
सीडॅक, पुणे (जीस्ट) ह्यांनी ह्या टंकाची निर्मिती केली असून हा टंक राज्य मराठी विकास संस्थेद्वारे जनतेला मुक्त स्वरूपात वितरित करण्यात येत आहे.
#####यशोमुद्रा आणि यशोवेणू हे दोन्ही टंक प्रयोगात्मक असून ते टंकविकसित करणाऱ्यांसाठी प्रमाण/ प्रतिमानरूप (मॉडेल) म्हणून समजण्यात येऊ नयेत. तसेच देवनागरीसाठी टंक तयार करताना त्या प्रकल्पांत हे टंक पूर्वसंदर्भ म्हणून गणण्यात येऊ नये
https://github.com/rmvsmumbai/Yashomudra/releases
विविध भाषांच्या लिप्यांतील माहितीची संगणकावरील साठवणूक आणि देवाणघेवाण अचूक आणि सुलभरीत्या व्हावी ह्यासाठी जगभरात युनिकोड ही प्रमाणित संकेतप्रणाली वापरण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनानेही मराठी भाषेचा संगणकावर वापर वाढावा ह्यासाठी युनिकोड वापरून काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
युनिकोड वापरून संगणकावर काम करताना युनिकोड-आधारित टंकाची (फॉण्टची) आवश्यकता असते. महाराष्ट्रशासनाने दि. ६ नोव्हेंबर २००९ रोजी केलेल्या वर्णमाला आणि वर्णलिपीविषयक शासननिर्णयातील (https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20091106130447001.pdf) सूचनांशी जुळणारे युनिकोड-आधारित काही उत्तम टंक तयार करून ते जनतेला मुक्त (फ्री अॅण्ड ओपन सोर्स) परवान्यासह द्यावे असा विचार राज्य मराठी विकास संस्थेद्वारे करण्यात आला.
राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन हे टंक केवळ विनामूल्यच नव्हे तर मुक्त परवान्यासह (जीपीएल-३) जनतेला उपलब्ध करून देत आहे.
https://github.com/rmvsmumbai/Yashomudra/blob/master/License_GPLv3.txt